Thursday, July 20, 2017


होडी हरवलीय


“कागद दुमडून विमानं करायला लागलीयत सगळी जणं, सोपी सुंदर होडी कोणी बनवतंच नाही, पावसात होड्या सोडणं तर दुरच,” काटदरे बाईंचं असं हताश बोलणं ऐकून समीरने ठरवलं.

त्या रात्री, नाजूक हातानी त्याने ३०-४० रंगीबेरंगी वेगवेगळ्या कागदांच्या होड्या बनवल्या आणि सकाळी शाळेत नेल्या पिशवीत भरून. बाईंनी एक-एक होडी मोठ्या आवडीने बघितली आणि जवळपास प्रत्येक होडी मी घेवू का असं विचारलं. समीर चा आनंद त्याच्या छोट्याश्या डोळ्यात मावत नव्हता. लाल जिलेटीन पेपरची होडी तर फारच ऊठून दिसत होती, समीरसारखीच नाजूक होती ती. बाईंनी आपल्या पदराने समीर चे डोळे पुसले, अगदी आई पुसते ना तसे. म्हणाल्या, “असा रडतोस कशाला? येवढ्या सुंदर होड्या बनवल्यास ना, मग! आता पाऊस पडला ना, की या होड्या पाण्यात सोड आणि त्यांचे फोटो काढायला सांग आईला”

आणि दुसऱ्याच दिवशी पाऊस पडायला सुरवात. “अगदी जोSSडात”, समीर म्हणतो ना तसा, जराही थांबला नाही. काटदरे बाई शाळेत जाऊच शकल्या नाहीत. सारखं त्यांचं मन त्यांना शाळेकडे ओढत होतं. पावसाने सकाळी एवढा काळोख केला होता की सांगता सोय नाही. आणि धो धो पावसात काही काम ही सुचत नव्हतं. डोक्यात समीरचेच विचार सारखे येत होते.

समीर काही ब्राईट मुलगा नव्हता, मागेच असायचा प्रत्येक गोष्टीत. पण काल समीर ‘छा गया’. वेळ जाता जात नव्हता, घरातली कामं तर सकाळीच झालेली. घरात पोस्टर पेपर होताच, त्यावर त्यांनी समीरच्या होड्या चिकटवल्या आणि खाली नाव लिहिलं, कलाकार :  समीर, इयत्ता दुसरी. त्यांची मुलगी नीमा, उठायच्या आत पोस्टर तयार झालं म्हणून बरं, नाहीतर तिने मध्ये लूडबूड केली असती किंवा होडी मागितली असती पाण्यात सोडायला.

नीमाला जाग आली तेव्हा तिला कळलं की आज काहीतरी वेगळं आहे. आज आईने झोपेतून उठवलं नाही. सुट्टीचा वार नाही पण आई बाबा घरी? “आज डे-केअर ला शुट्टी! आणि जोSडात पाऊस.” नंतर तिला कळलं की पावसामुळेच आज सगळे घरी आहेत. आवरून झालं तसं ती मागेच लागली, “होडी हवी, पाऊसात खेळायचंय, मॅगी खायचंय, गाडीतून भूर जायचंय” नुसती न संपणारी यादी. बाबांनी तिला कडेवर घेतलं आणि दोघेही भूर गेले. बाईंनी नेहमीप्रमाणे बरोबर जायचं टाळलं.

काटदरे बाई घरात एकट्याच. मोबाईल वर येणाऱ्या मेसेजमधून पावसाचे कारनामे कळत होते. शाळेत कोणी आलं नसेल तर बरं होईल. खास करून आपल्या वर्गातली छोटी मुलं. ती पावसात मजा करत असतील, नीमा सारखी? त्यांना त्यांचे बाबा फिरायला नेतील का? समीर काय करत असेल? पावसाबरोबर सगळा दिवस असाच वाहून गेला. नीमा खेळून, भिजून संध्याकाळी लवकर झोपली. इतर खेळण्यांबरोबर सर्दी पण घेऊन आली होती.

सकाळी बाई लवकरच पोचल्या शाळेत. सगळे आले होते वर्गात, समीर सोडून. समीरचं पोस्टर बाईंनी वर्गातल्या भिंतीवर लावलं. सगळ्या मुलांनी ते पोस्टर जवळ जाऊ बेंचवर चढून बघितलं. समीर असता तर खुष झाला असता. पावसात भिजला असेल आणि नीमासारखा... पण मी नीमाला तर डे केअर मध्ये कोंबून आलेय. डोळ्याच्या कडा पाणावल्या या विचाराने.  भरभर दिवस संपवून बाई घरी गेल्या. नीमा ला घट्ट मिठी मारली. नीमाच्या खांद्यावर परत पाऊस पडला.

दोन दिवसांच्या सुट्टीनंतर, समीर शाळेत आला, लपून छपून रडत होता, डाव्या गालावर लाल लाल पट्टे होते त्याच्या. बाईंनी समीरला जवळ घेतलं आणि विचारलं. “मी नाेटेची होडी बनवली म्हणून नवीन बाबा रागवले.” नवीन बाबा? आणि त्यांनी ह्या एवढ्या लहान मुलाला थोबाडीत मारली? बाईंना खूप रडू फुटलं. "नीमा मोठी झाल्यावर, मला नवीन आई तर म्हणणार नाही ना?"

या पावसात, समीरच्या होड्यांनी नात्यानी दुरावलेली सावत्र मुलगी नीमा मात्र, जवळची झाली...

सदर १ः मनाशी संवाद टेलेपॅथी (दूरमनोसंप्रेषण) च्या नेटवर्क वर तीन मेंदूचा संवाद घडवून आणला गेला काही दिवसांपूर्वी ! मेंदूच्या लहरी समजण...