सदर १ः मनाशी संवाद
टेलेपॅथी (दूरमनोसंप्रेषण) च्या नेटवर्क वर तीन मेंदूचा संवाद घडवून आणला गेला काही दिवसांपूर्वी ! मेंदूच्या लहरी समजणाऱ्या आणि प्रक्षेपित करण्याऱ्या यंत्रांचा वापर करून, वॉशिंगटन युनिवर्सिटी आणि कार्नेगी मेलन युनिवर्सिटी च्या शास्त्रज्ञांनी हा खेळ करून दाखवला. खरचं. ती तीन माणसं कॉम्प्युटर गेम खेळली एकमेकांशी टेलेपॅथीने संवाद साधत. एक जण खेळत होता आणि इतर दोन मित्र त्याला सांगत होते कसं खेळायचं ते. आणि ते सुद्धा एकमेकांपासून खूप खूप लांब बसून आणि कॉम्प्युटर ला हातही न लावता!
तुम्हालाही कधी कधी तुमच्या फ्रेंडच्या मनातलं न सांगता कळतं ना. आजी आजोबा नी सांगितलं तसं, उचकी लागली किंवा जिभ चावली की कोणीतरी आठवण काढली असं म्हणतात. मग आपल्याला वाटतं, 'बहूतेक मावशी ने आठवण काढली असेल' आणि फोन लावला तर ते खरंच निघतं. किती मस्त वाटतं ना तेव्हा. मग विचार करा, की जर आपल्या मेंदूला एवढं कळतं तर मोबाईलची गरजच काय?
मोबाईल!
मोबाईल जाणार आता. आपण लवकरच मोबाईल शिवाय एकमेकांशी बोलायला शिकणार. "हातच्या काकणाला आरसा कशाला" ही जी म्हण आहे तशी नवीन म्हण निघेल "मनांच्या संवादाला मोबाईल कशाला". सगळं मनातल्या मनात बोलायचं. चार्जिंग संपलं, रेंज नाही, नंबर अस्तित्त्वात नाही, भानगडचं नाही. कर्कश्य रिंगटोन नको, सकाळचे घाबरवून टाकणारे अलार्म नकोत, गोड आवाजात आई मनातल्या मनात हाक मारेल आणि मी एकदम प्रसन्न मनाने उठीन. आणि आई रागावली तर.... नको रे बाबा !
अभ्यास करताना काहीतरी विसरायला झालं तर मित्र-मैत्रिणींची आठवण काढायची, ज्यांना येत असेल ते सगळे उत्तर देतील. नेटवर्क मध्ये अभ्यास करायचा आणि काय एकमेकां सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. एखाद्याने जरा कंटाळा केला तर सगळ्यांनी चिअर-अप करायचं, कुणालाच कळलं नाही तर मोठ्यांना किंवा वेळ असेल तर शिक्षकांना रीक्वेस्ट करायची. डायरेक्ट एखादी गोष्ट मनात शिरली तर, शिक्षक किती खुष होतील. त्यांना जे साध्य करायला जीव आटवून मेहनत करावी लागते, ते आता सहज साध्य होईल. सगळं थेट मुलांच्या मनात (भेज्यात चालेल का) घुसवायचं. अभ्यासच का? कसलीही अडचण आली, पुढे धोका दिसला, रस्ता सापडेनासा झाला, शब्द कोड सुटायला एकच रकाना बाकी आहे, अमिताभ विचारतोय, ' क्या इस जवाब पे ताला लगाया जाये?', अहा! पण हे परीक्षेत नाही चालायचं बर का. मी परीक्षेच्या वर्गात जॅमर (सगळ्या प्रकारच्या माहितीच्या लहरी अडवणारं यंत्र) लावून ठवलाय.
सगळ्यांचा एकटेपणा दूर होईल, सगळे मनानी जवळ येतील. त्यासाठी वॉट्सअॅप सारख्या माध्यमाची कुसंगती नको. फेक न्युज नको की वाईट बातम्या नकोत. गॉसिपिंग करा मनात मनात आणखी वर खुदकन हसा. कोणाला काही कळणार नाही, तुमच्या सोशल नेटवर्क नसले तर. हे एक सोशल नेटवर्क च आहे, मनांचं मनाशी जोडलेल. आणि हो, तुमचा टॉमी, तुमची मनी नुसते भाव भाव म्याव म्यावं करणार नाहीत. तुमच्या कुटुंबाचे ते महत्त्वाचे सदस्य "आज जेवण खूपच मस्त होतं, आई," "ताई, छत्री घेऊन जा, पाऊस पडणार आहे जोरात दुपारी" असं मनापासून सांगतील. नाहीतर दिवसरात्र नुसतेच "सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला" भसाड्या आवाजात गात राहतात. आणि झाडं...?
कस काम करेल हे ?
एका माणसाची टीम - माणूस एक पण मेंदू अनेक. विचार करा, अश्या अफाट बौद्धिक क्षमतेच्या माणसासाठी काय अशक्य आहे. Artificial intelligence पेक्षा हे अधिक चांगलं नाही का?
माणूस शिकेल तेंव्हा शिकेलच, पण आत्तातरी, दोन वेगवेगळी संशोधने या शक्तीला बुस्ट करण्यासाठी काम करताहेत त्यातला एक प्रकार म्हणजे रोपण. आत्ता या घडीला खूप वेगवेगळ्या प्रकारची मेंदू अनुवृद्धी रोपण ( ब्रेन बूस्टिंग इंप्लांट्स) अस्तित्त्वात आहेत - काही वैद्यकीय उपचारांसाठी जसे पार्कीनसन्स, सीझर्स आणि डीप्रेशन, श्रवण दोष तर काही मेंदूची क्षमतावृद्धीसाठी जसे स्मरणशक्ती, हेरगिरी, तर काही ज्ञानेंद्रियांच्या आणि मेंदूच्या अभ्यासासाठी. हे झालं इंवेसिव्ह तंत्र किंवा ऑपरेशन करून रोपण करण.
दुसरा सोपं (त्यामानाने). पोहण्याची टोपी असते ना, तशी टोपी घालायची त्यावर इलेक्ट्रिक activity संवेदना गोळा करणारे रिसेप्टर असतील. हे सगळे सिग्नल तुम्हाला हव्या त्या व्यक्ती पर्यंत पोचवतील. हा नॉन इन्वसिव्ह - कापाकापी न करता केलेला उपद्व्याप. अधिक माहितीसाठी पहा:
तुम्ही काय निवडणार? टोपी घेतली तर तिची फॅशन येऊ शकेल असा तिचा आवाका आहे - हॅरी पॉटर मधली बोलणारी टोपी आठवते का? ती याच तंत्रज्ञानाचा एक कलाविष्कार आहे.
चिप निवडली तर....
करा विचार आणि कळवा आम्हाला
No comments:
Post a Comment